तोफा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
पुणे, ९ जानेवारी २०२३ : पाडळदा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे श्री. अरुण हरी पाटील यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी मजूर खोदकाम करीत असताना सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या पुरातन ऐतिहासिक दहा तोफा सापडल्याने परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे.
श्री. अरुण हरी पाटील यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस घराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू होते. सुरेश ठाकरे (रा. सोनवल- कवळीथ) हे मजुरांसह खोदकाम करीत असताना लोखंडाची जड लांब वस्तू आढळून आली. ती बाहेर काढण्यात आली. पुन्हा खोदकाम सुरू केले असता, एकापाठाेपाठ दहा लहान-मोठ्या वस्तू निघाल्या. मजूर सुरेश ठाकरे यांनी घरमालक अरुण पाटील यांना याची माहिती दिली. त्यांनी त्या वस्तू बघितल्या असता, ऐतिहासिक पुरातन तोफा असल्याचे निदर्शनास आले. ही वार्ता गावात पसरल्याने ग्रामस्थांनी बघण्यासाठी गर्दी केली. या तोफा काही पाच फुटांच्या, तर काही चार फुटांच्या आहेत. सर्व तोफा पंचधातूच्या आहेत. त्यापैकी एक पितळी धातूची आहे. पुढचा भाग गोलाकार असून, हातगोळा टाकण्यासाठी जागा आहे. मागच्या बाजूला बंदिस्त आहेत. या तोफांवर कोणत्याही प्रकारचे लिखाण केलेले नाही; मात्र सर्व तोफा चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे या तोफा ऐतिहासिक संशोधनाचा विषय आहे. तोफा या नेमक्या किती पुरातन आहेत, कोणाच्या काळातील आहेत, त्यांची ऐतिहासिक महिती पुरातत्त्व विभागाचे पथक आल्यानंतरच समजू शकणार आहे.
पाडळदा ग्रामस्थांनी मात्र या ऐतिहासिक वस्तू गावाच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या असल्याने जतन करण्यासाठी गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन या तोफांचा पंचनामा करून वरिष्ठांना माहिती कळविली आहे. दरम्यान, शहादा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनीही भ्रमणध्वनीद्वारे घरमालक अरुण पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे.
पाडळदा गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गावाच्या चोहोबाजूंना मोठी खंदक होती. गावात येण्या-जाण्यासाठी एकच दरवाजा होता. अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील दोन मोठ्या पाय विहिरीदेखील आहेत. इंग्रजांच्या विरोधात लढा देण्याचा इतिहास या गावाला आहे. गावात स्वातंत्र्यसैनिक होते. जुन्या काळात गावाच्या संरक्षणासाठी या तोफांच्या वापर केला जात असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहादा तालुक्यात सुलतानपूर, फत्तेपूर, कोंढावळ या जुन्या ऐतिहासिक गावांमध्ये अद्यापही पुरातन वस्तू अधूनमधून आढळत असतात.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील