रायगडावरील उत्खननात सापडले मौल्यवान वस्तू, नाणी आणि शस्त्र

रायगड, दि. १८ मे २०२०: स्वराज्याची राजधानी व छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेला किल्ले रायगडचा कायापालट होत आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुमारे सहाशे कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येणार असून या सर्व कामांची देखभाल रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत खासदार संभाजीराजे भोसले हे स्वतः करत आहेत.

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ल्याची डागडुजी आणि संशोधन चालू आहे. उत्खननामध्ये मिळून येणारे ऐतिहासिक पुरावे, यातून पूर्वीचे बांधकाम व शिव इतिहास पुन्हा समाजासमोर आणण्यासाठी व छत्रपतींचा ज्वलंत इतिहास जगासमोर आणण्यासाठी व इतिहास जागा करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरण कार्यरत आहे.

या कामाचा नवीन आढावा रायगड विकास प्राधिकरणाने समोर आणला आहे तो पुढील प्रमाणे. १८१८ साली रायगडावर इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यात गडावरील वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले. अनेक वास्तू जमिनीखाली दबून गेल्या, तर काही काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या. सभासद बखरीमध्ये रायगडावर ३५० वास्तू असल्याचा उल्लेख आहे. गडावर सध्या जितक्या वास्तू दिसतात त्याहून अधिक ह्या जमिनीखाली दबलेल्या आहेत. या वास्तूंच्या बरोबर अनेक मौल्यवान वस्तू, शस्त्रे, यांच्या रुपाने तत्कालीन रायगडाची संस्कृती व परंपरा देखील जमिनीखाली दबल्या गेल्या आहेत.

या वास्तूंचा शोध घेण्यासाठी गडावर उत्खनन करणे अत्यंत गरजेचे आहे. हे विचारात घेऊन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुण्याच्या डेक्कन काँलेजच्या तज्ञांच्या सहाय्याने व पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली महत्वाच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करण्यात आले. या उत्खननामध्ये अनेक ऐतिहासिक वस्तू, मूर्ती, नाणी, तोफगोळे, बंदुकीच्या गोळ्या, नाणी इ. सापडलेल्या आहेत. याशिवाय एका मोठ्या वाड्याचे अवशेष या उत्खननात मिळून आले आहेत. अशाच पध्दतीने अनेक वाडे गडावर नव्याने मिळून येतील. अशी प्राधिकरणाची खात्री आहे.

तलावातील गाळ काढताना मिळालेल्या व उत्खननात हाती लागलेल्या ऐतिहासिक वस्तू गडावरील शिवकालीन व उत्तरकालीन राहणीमान, रायगडावरील प्रथा परंपरा, चालीरीती यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसेच कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी मिळाली याचेही डॉक्यूमेटेंशन करण्यात आले असून यावरून वेगवेगळी ठिकाणे व वास्तू नेमक्या कोणत्या
कारणासाठी वापरात आणल्या जात होत्या याचा नेमका अभ्यास करता येणार आहे.

गडावरील उत्खनन हा प्राधिकरणाचा प्रमुख अजेंडा आहे. तसेच काही ठिकाणी पडझड झालेल्या वास्तूंचे दगड मिळून आल्यास त्याचा उपयोग त्या वास्तूची पुर्नबांधणी करण्यासाठी होऊ शकतो. उत्खननात मिळालेल्या सर्व ऐतिहासिक वस्तू व अवशेष अभ्यासकांना व पर्यटकांना पाहता यावेत यासाठी गडाच्या पायथ्याला प्राधिकरणामार्फत जी जमीन संपादित जिजाऊंच्या वाड्यानजिक केली आहे तेथे कायमस्वरूपी वस्तूसंग्रालय उभारण्यात येणार आहे.

गडावरील वास्तुंची स्वच्छता

प्राधिकरणामार्फत गडावरील वास्तुंची काही वर्गीकरणाच्याआधारे शास्त्रोक्त पद्धतीने पावसाळ्यानंतर स्वच्छता करण्यात आली. यासाठी ज्या वास्तूंची स्वच्छता करावयाची आहे त्याचे दस्तावेजीकरण व अभ्यास करून त्याची रचना, बांधकाम पद्धती, बांधकाम साहित्य, वातावरणाचे त्यावर होणारे परिणाम, झाडे झुडपे वाढण्याची कारणे इ. गोष्टींचा विचार करूनच स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा