महावितरण चा अतीरेकी कारभार, पंधरा वर्षाखालील थकबाकीपोटी नवीन ग्राहकांना मनस्ताप

मुंबई १७ जून २०२३: राज्यात महावितरण कंपनी कडून वीज थकबाकी वसुली धडक मोहीम सुरु झालीय. २००४-५ अथवा त्यापूर्वी ज्यांचा वीजपुरवठा कायम स्वरुपी खंडीत करण्यात आलाय, त्यांच्याकडून महावितरण कंपनीने सध्या थकीत वीज वसुली सुरु केलीय. काही वीज ग्राहकांना थकबाकी नसतानाही वसुलीच्या नोटीसी पाठवल्या आहेत. काहींना त्यांच्या बिलात पंधरा वीस वर्षांच्या मागील थकबाकी टाकून, वाढीव वीज बिले पाठविली, अशा नियमबाह्य वसुली विरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने आवाज उठवला आहे.

महावितरण कंपनी कडुन राज्यात वीज थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. त्यात अनेक जुन्या प्रकरणातील वसुली आताच्या बिलात लावण्यात आलीय. काही वीज ग्राहकांना महावितरणचे कर्मचारी भेटून, तुमच्या जागेतील मागील थकबाकी भरा अन्यथा वीज खंडित करण्यात येईल अशा धमकीवजा सूचना देत आहेत. महावितरणची ही वीज थकबाकी संपूर्णपणे बेकायदा आहे. अशा चुकीच्या वसुली कारवाईला कोणी दाद देऊ नये यासाठी कायदेशीर सल्ला, माहीती आणि मदतीसाठी वीज ग्राहक संघटनेच्या इचलकरंजी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीज तज्ञ्ज प्रताप होगाडे यांनी केले.

जुन्या थकबाकी वसुलीसाठी नोटीस द्यायची असेल तर ती नोटीस संपूर्ण तपशिलासह, माहितीसह आणि पुराव्यासह द्यायला हवी होती. तसेच या नोटीसीला उत्तर देण्यासाठी ग्राहकांना पुरेसा अवधी द्यायला हवा, गरज वाटल्यास त्या संबंधी सुनावणी घ्यायला हवी, जर खरच थकबाकी असेल याची खात्री झाल्यास, ग्राहकाची मागणी फेटाळण्याचा पर्याय महावितरण कडे होता, असे ग्राहक संघटनेचे म्हणणे आहे.

सर्व सोपस्कार केल्यावरच त्या ग्राहकावर दिवाणी दावा दाखल करून वसुलीची कारवाई करायला हवी होती, परंतू कोणत्याही नियम आणि तरतूदीचे पालन न करता कंपनीने बेकायदेशीर आणि अतिरेकी मोहीम सुरु केल्याचे निदर्शनास आले, प्रत्यक्षात बहुतांशी प्रकरणात थकबाकी नसल्याने कंपनीकडे थकबाकीचे पुरावेच नाहीत आणि तपासणीसाठी देखील ग्राहकांचे तत्कालिन खातेही उरलेले नाही असे निदर्शनास आले असल्याचे असे, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष होगाडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा