महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुरू असलेल्या गांधी सप्ताहात राज्य उत्पादन शुल्क (Excise) विभागाने अवैध दारू वाहतुकीविरोधात जोरदार धडक कारवाई सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात ‘एक्साईज’च्या ‘जी’ विभागाने केलेल्या विशेष कारवाईत गावठी दारूचे ४० कॅन आणि वाहतुकीसाठी वापरलेले एक पिकअप वाहन असा १० लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पिंपरीतील संत तुकारामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयित सचिन बन्सी आडे (वय २६) याच्या ताब्यातील चारचाकीची कसून तपासणी केली. तपासणीअंती हा मोठा साठा आणि वाहन जप्त करण्यात आले. आरोपी सचिन आडे याला या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे.
एक्साईजचे अधीक्षक अतुल कानडे आणि उपअधीक्षक सुजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अभय औटे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पथकात निरीक्षक संजय कोल्हे, बी. जी. रेडेकर, गणेश पठारे आणि जवान प्रमोद पालवे, विजय घंदुरे, अमोल कांबळे, प्रिया चंदनशिवे, समीर बिरांजे यांचा समावेश होता.
दरम्यान, २ ऑक्टोबरपासून पुणे एक्साईजतर्फे सुरू असलेल्या या विशेष मोहिमेंतर्गत ‘जी’ विभागाने आत्तापर्यंत एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. यात दोन वाहनांसह एकूण १२ लाख ५८ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीच्या विरोधात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































