उस्मानाबाद, दि. २६ जुलै २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक हे संतप्त झालेले आहेत. अनेक कामधंदे ठप्प असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा या महामारीच्या काळात, नागरिकांच्या समस्येला समजून घेऊन त्यांना दिलासा द्यायला हवा.
मात्र, महावितरणकडून भरमसाठ वीज बिल आकारले जात आहेत. या कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कळंब शहराच्या तहसीलदारांना निवेदन दिले गेले आहे. या निवेदनात कळंब शहरातील नागरिकांचे मार्च २०२० पासून ते आजतागायत पर्यंतचे वीज बिल माफ करावे अशी मागणी करण्यात आली आहे. .
लॉकडाउनच्या काळात अनेक कामधंदे बंद आहेत. नागरिकांना या काळात अनेक अडचणी येत आहेत. त्यात जर वीज बिल माफ करण्यात आले, तर नक्कीच नागरिकांना खूप मोठा आधार मिळेल, असे या निवेदनाद्वारे तहसीलदारांना म्हटले आहे. सोबतच, जर वीज बिल माफ नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला गेला आहे. म.न.से कळंब शहराध्यक्ष अमोल राऊत, तालुकाध्यक्ष सागर बारकुल, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोंदर, गोपाळ घोगरे, संजय कोळी, विलास बंडगर, कृष्णा गंभीरे, गणेश घोगरे, आदींनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड