मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या घराजवळ स्फोट, २ ठार, १७ जखमी

4

नवी दिल्ली, २४ जून २०२१: पाकिस्तानच्या लाहोरमधील जौहर शहरात स्फोट झाला आहे. यात २ लोकांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाल्याची नोंद आहे. पाकिस्तानी मीडिया डॉनच्या म्हणण्यानुसार, बचावमध्ये सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितले की एहसान मुमताज हॉस्पिटल जवळील ई ब्लॉकमध्ये हा स्फोट झाला. मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याच्या घराजवळ हा स्फोट झाला असा दावा माध्यम अहवालात केला जात आहे.

लाहोरचे सीसीपीओ गुलाम महमूद डोगर यांनी माध्यमांना सांगितले की, सर्व जखमींना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस पाइपलाइन किंवा गॅस सिलिंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे बचाव पथकाच्या सदस्याने सांगितले. याबद्दल अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. या स्फोटामुळे जवळपासच्या घरांचेही नुकसान झाले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याचे घर फक्त ६ वर्षांपूर्वी बांधले गेले होते, त्या स्फोटात घराला मोठे नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर पाकिस्तान पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी आयजीला घटनेची चौकशी करुन लवकरच अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेस जबाबदार असणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. यासह स्फोटात जखमी झालेल्यांना आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा