भारतातून होणारी हिऱ्यांची निर्यात दहा टक्क्यांनी घटली, हिरे बाजारावर मंदी चे सावट

सुरत १८ मे २०२३:हिऱ्यांचे प्रमुख आयातदार असणाऱ्या अमेरिका आणि चीनसारख्या देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेतीळ मंदीमुळे, भारताकडून हिऱ्यांची मागणी कमी केलीय. या प्रमुख आयातदार देशांकडून ऑर्डर कमी झाल्यामुळे भारतातून हिऱ्यांची निर्यात १०% ने कमी झालीय. देशांतर्गत बाजारातील त्यांच्या किमतीही अंदाजे १०% कमी झाल्या आहेत. अमेरिकेत महागाई जास्त आहे. चीनमधील साथीच्या रोगाशी संबंधित निर्बंध उठवल्यानंतर, आर्थिक धोरणात सुधारणा अपेक्षेपेक्षा कमी आहे. ही काही प्रमुख कारणे या मागे आहेत.

येत्या काळात सोन्याच्या किमतीतील होणाऱ्या सततच्या अस्थिरतेमुळे भारतीय हिरे व्यापाऱ्यांसमोर आव्हान निर्माण होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची निर्यात सुमारे १.८१ लाख कोटी रुपये इतकी होती. ती या आर्थिक वर्षात आता कमी होताना दिसतेय.

जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या(जेजीईपीसी) तज्ज्ञांच्या मते, यंदा हिरे विक्रीतील मंदी दीर्घकाळ टिकू शकते. हिरे उद्योगासाठी चालू आर्थिक वर्ष कठीण जाऊ शकते. पॉलिश्ड हिऱ्यांची मागणी सध्या रोडावली आहे. त्यामुळे डीसीटी (डीबियर्स डायमंड ट्रेडिंग) वेबसाइटवर मोठ्या आकाराचे रफ हिरे १०% कमी झाले आहेत. जगातील हिरे उद्योगातील मंदीचा थेट परिणाम सुरतच्या हिरे उद्योगावर होताना दिसत आहे. उत्पादन घटले आहे. काही कारखान्यांमध्ये दोन दिवस सुट्टी तर काही कारखान्यांमध्ये कामाचे तास कमी करण्यात आले आहेत. सुरतच्या आणखी काही हिरे कारखान्यांमध्ये तर तब्बल एक महिन्याची सुट्टी सुरू आहे. या सुट्ट्यामुळे डायमंड कटिंग-पॉलिशिंग खूपच कमी झालय.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा