नवी दिल्ली, १५ डिसेंबर २०२२: संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलंय. हा पुतळा भारतानेच UN ला भेट म्हणून दिला होता, जो आता UN मुख्यालयात बसवण्यात आलाय. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस उपस्थित होते. या पुतळ्याचे शिल्पकार पद्मश्री पुरस्कारप्राप्त राम सुतार आहेत ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना केली होती.
UN मध्ये महात्मा गांधी पुतळा
डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची अध्यक्षता भारत करत आहे. अशा परिस्थितीत भारताने हा महात्मा गांधींचा पुतळा संयुक्त राष्ट्र संघाला भेट म्हणून दिलाय. यावेळी संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, महात्मा गांधींची अहिंसा आणि शांतता ही विचारधारा आजही महत्त्वाची आहे. हे युद्धाचं युग नाही, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. अशा स्थितीत ही विचारधारा संपूर्ण जगानं स्वीकारलीय. असं नाही की केवळ भारतानेच अशा मूर्ती UN ला भेट म्हणून दिल्या आहेत. वेळोवेळी अनेक देशांनी त्यांच्या संस्कृती आणि विचारसरणीच्या दृष्टीनं वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेने UN मध्ये नेल्सन मंडेला यांचा पुतळा बसवला.
भारताचा दहशतवादावर हल्ला
पुतळ्याच्या अनावरणानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, सध्या जग हिंसाचार, युद्धानं झगडत आहे, अशा वेळी महात्मा गांधींची तत्त्वेच मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्या तत्त्वांद्वारे शांतता प्रगत होऊ शकते. संबोधनादरम्यान, पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता, काही देश दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं परराष्ट्रमंत्र्यांच्या वतीनं भर देण्यात आला. ते म्हणाले की, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी काही देशांकडून बहुपक्षीय मंचांचा गैरवापर केला जातोय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे