परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तान, चीनला कठोर शब्दांत इशारा

16

नवी दिल्ली, ३१ डिसेंबर २०२२ : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी भारतीय समुदायाशी संवाद साधताना पाकिस्तान आणि चीनला कठोर शब्दांत संबोधित केले. भारताला सर्वांशी चांगले शेजारी संबंध हवे आहेत; परंतु याचा अर्थ “दहशतवादाला माफ करणे असा होत नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. भारताला वाटाघाटीच्या स्थितीवर आणण्यासाठी दहशतवादाचा वापर हत्यार म्हणून केला जाऊ शकत नाही,” असेही ते म्हणाले.

तर चीनसोबतच्या सीमाप्रश्नावर बोलताना, वास्तविक नियंत्रण रेषा बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नास भारत कधीही सहमत होणार नाही. त्यामुळे सीमेवर आव्हाने आहेत. कोविडच्या काळात सीमेवरील आव्हाने तीव्र झाली आहेत याची आम्हाला कल्पना आहे, असेही ते म्हणाले. ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक झाल्यानंतर काही दिवसांनी ही विधाने आली. चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर देणार्‍या भारतीय बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सरकारने सांगितले.

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रसंघातील दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात बाचाबाची झाली. “आमच्याइतका कोणत्याही देशाला दहशतवादाचा त्रास झाला नाही. आम्ही कधीही दहशतवादाला चर्चेच्या टेबलावर आणू देणार नाही. आम्हाला सर्वांशी चांगले शेजारी संबंध हवे आहेत. माफ करणे किंवा दूर पाहणे किंवा दहशतवादाला तर्कसंगत करणे असा याचा अर्थ नाही हे मी स्पष्ट करतो,” असे पाकिस्तानसोबतच्या संबंधांबद्दल बोलत असताना एस. जयशंकर यांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा