नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर २०२०: उत्तर भारतातील बहुतेक भागात कुडकुडी भरवणारी थंडीला सुरुवात झालीय. देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या राज्यांत तापमानात घट दिसून येत आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरसह खोऱ्याच्या बर्याच भागात किमान पारा शून्याच्या खाली पोहोचलाय. दरम्यान, तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशमधील बहुतांश भागात पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
नोव्हेंबरमध्ये दिल्लीत थंडीनं मोडला १७ वर्षांचा विक्रम
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काल (२३ नोव्हेंबर २०२०) किमान तापमान ६.३ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आलं. हे गेल्या १७ वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान आहे. भारत हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी दिल्लीत किमान तापमान ६.९ डिग्री सेल्सियस आणि कमाल तापमान २४.२ डिग्री सेल्सियस होतं, या महिन्यातील सर्वात कमी तापमान होतं
आयएमडीच्या प्रादेशिक पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सफदरजंग वेधशाळेत किमान तापमान ६.३ डिग्री सेल्सियस होतं, यापूर्वी हे तापमान नोव्हेंबर २००३ मध्ये नोंदवलं गेलं होतं. त्यावेळी तापमान ६.१ डिग्री सेल्सियस नोंदविलं गेलं. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील तापमान या आठवड्याच्या अखेरीस ७ अंशांपर्यंत राहील.
हिमाचल प्रदेशात पावसाचा इशारा
शीतलहरीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविलाय. हिमाचलच्या लाहौल-स्पीती जिल्ह्यातील केलोँग हे सर्वात थंड ठिकाण आहे, जिथं तापमान वजा ६.४ डिग्री सेल्सियस होतं, तर कुफरीचे तापमान ३.६ डिग्री सेल्सियस आणि डलहौजीचं ३.६ डिग्री सेल्सियस होतं. शिमला मध्ये तापमान ५.१ डिग्री सेल्सियस आहे. उना राज्यात सर्वाधिक तापमान २३.२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे