शिंदे यांची प्रतिमा डागाळण्यासाठी फडणवीसांनी केला पवारांच्या नावाचा गैरवापर, राष्ट्रवादीचा मोठा आरोप

मुंबई, २९ जून २०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा ‘दुरुपयोग’ करून, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने आज केला.

भारतीय जनता पक्ष (भाजप) नेते फडणवीस यांनी एका मुलाखतीत दावा केला होता की, पवारांनी २०१९ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचे मान्य केले होते, परंतु नंतर तीन-चार दिवसांनी माघार घेतली. पवारांनी जर कुठली गोष्ट केली असेल तर ती मुसद्देगिरी ठरते आणि तेच जर एकनाथ शिंदेंनी केलं तर बेईमानी कशी? शिंदेंची केस बघितली तर ती मेरिटची केस आहे, अशा फडणवीसांच्या काही वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी एका निवेदनात म्हटलय की, गेल्या काही दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातींमध्ये कमीपणा दाखवून देवेंद्र फडणवीस लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच ते मुलाखतींमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिमा डागाळण्यासाठी शरद पवारांच्या नावाचा गैरवापर करत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, २०१९ च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून दीर्घकाळचा मित्र असलेल्या भाजपशी संबंध तोडले. नंतर अचानक राजभवनात फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि तरीही हे सरकार केवळ ८० तासच टिकले. ठाकरे यांनी नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करून राज्यात महाविकास आघाडी (एमव्हीए ) सरकार स्थापन केले. गेल्या वर्षी जूनमध्ये शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारले, त्यामुळे पक्षात फूट पडली आणि एमव्हीए सरकार पडलं. शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा