नाशिक, २९ जून २०२३ : देशात आज सगळीकडे ईद निमित्त उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी नमाज अदा केली जात आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी सरकारवर घणाघात केला आहे. देशात समान नागरी कायदा आला तर स्वातंत्र्य संपेल अशी टीका आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केली आहे .समान नागरिक कायदा देश हिताचा नाही. भारतात ८३९ पर्सनल लॉ आहेत. जे बदलू शकत नाहीत. कुणा कुणाचा कायदा बदलणार आहात? असा सवाल मुफ्ती इस्माईल यांनी विचारला आहे.
भारत हा सुंदर देश आहे. त्याचे कारण म्हणजे येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्व धर्म आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. समान नागरिक कायदा आला तर स्वतंत्रता संपेल. त्यामुळे या कायद्याला देशातले बहुसंख्य लोक विरोध करतील. कारण अनेक लोकांचे स्वातंत्र्य संपेल, असे मुफ्ती इस्माईल म्हणाले आहेत.पसमंदा (दारिद्री) मुस्लिमांना समान नागरी कायद्याचा फायदा होईल असे नाही. अच्छे दिन ची वाट भारतातला प्रत्येक नागरिक पाहत आहेत ते आलेच नाहीत. मुसलमानांची पसमानंदगी संपेल. हे लाकडाचे लाडू आहेत, असे म्हणत मुफ्ती इस्माईल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे या समान नागरी कायद्याला विरोध करण्याचा या देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. लोकांचा या कायद्याला विरोध आहे आणि लोक तो विरोध करतील, असे मुफ्ती इस्माईल यांनी म्हटले आहे.दरम्यान बकरी ईदनिमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये नमाज अदा करण्यात आली. नाशिकच्या इदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्यात आले. ईद आणि आषाढीनिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानाच्या नमाजसाठी शेकडो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर














































