गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांना अपयश, मणिपूरमध्ये अद्याप शांतता नाही.

मणिपूर १७ जून २०२३: मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचार होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर काही दिवस पूर्ण शांतता प्रस्थापित झालेली. परिस्थितीही पूर्वपदावर येत होती, मात्र त्यानंतर दंगलखोरांनी पुन्हा धुमाकूळ घालायला सुरवात केलीय. या पार्श्वभूमीवर लष्कर, एएसआर रायफल्स, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त दलाने, राजधानीच्या पूर्वेकडील जिल्ह्यात मध्यरात्रीपर्यंत फ्लॅग मार्च काढला.

मणिपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून, पुन्हा जाळपोळ आणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. इंफाळ पश्चिमेतील भाजप प्रदेशाध्यक्षा अधिकारमयम शारदा देवी यांच्या घराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच्या एक दिवस आधी १२०० लोकांच्या जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला होता. त्यांच्या घराच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर आग लागली. शुक्रवारी संध्याकाळी परत एकदा सुमारे १००० लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. आरएएफने जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या, यामध्ये दोन नागरिक जखमी झाले.

केंद्र सरकार दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतय. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनीही अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या विनंतीवरून लोकांनीही शरणागती पत्करली, पण अपेक्षित गोष्टी घडत नसल्याने, हिंसाचार पुन्हा पुन्हा होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा