इंदापूर तालुक्यातील एका कुटुंबातील नऊ जणांसह दोघांची होणार तपासणी

16

इंदापूर, दि.२३ मे २०२०: इंदापूरकरांसाठी आज ( शनिवारी) मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावातील ९ व्यक्तींचे अख्खे कुटुंब आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या २ अशा एकूण ११ व्यक्ती कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे आज उघड झाले. त्यामुळे सबंध इंदापूरकर आज चिंतेत आहेत.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील एक पोलीस कर्मचारी पुण्याहून शुक्रवार दि.१५ मे रोजी दोन दिवसाची सुट्टी काढून आपल्या मूळगावी पळसदेव येथे आला होता. दोन दिवस घरी थांबल्यानंतर सोमवार दि.१८ मे रोजी पहाटे तो पुन्हा पुणे येथे कार्यरत असणाऱ्या आपल्या मुख्यालयात हजर झाला.

मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने तात्काळ या व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे इंदापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे.

शुक्रवार (दि.२२) मे रोजी इंदापूर तालुक्यातील पोंदकुलवाडी परिसरात दोन कोरोना रुग्ण आढळून आल्याने इंदापूर तालुक्यात खळबळ माजली होती. मुंबईहून आलेल्या मायलेकरांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर इंदापूर मधील डॉ. कदम गुरुकुल याठिकाणी उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण परिसरातील जवळपास अकरा नागरिकांच्या संपर्कात आले असल्याचेही स्पष्ट झाले.त्या नंतर या अकरा नागरिकांचे स्वैब घेण्यात आले. असे असतानाच पळसदेव मधील ही गंभीर घटना समोर आल्यामुळे इंदापूरकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

सध्या या कुटुंबातील अकरा सदस्यांचे स्वैब नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात येणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय ते समजेल. या सर्व कुटुंबाला तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.

सध्या पुणे आणि मुंबई अशा रेडझोन मधून मोठ्या संख्येने नागरिक इंदापुर तालुक्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये पुणे मुंबईसारख्या रेडझोन मधून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाला तत्काळ कळवावी. जे नागरिक या स्थलांतरित लोकांची माहिती प्रशासनापासून लपवतील त्यांच्यावर शासकीय नियमानुसार गुन्हे दाखल होणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवार (दि.२२) मे रोजी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे