प्रसिद्ध अभिनेत्रीला केरळातील मंदिरात नाकारला प्रवेश; जाणून घ्या नेमके प्रकरण काय?

10

नवी दिल्ली, १८ जानेवारी २०२३ : दाक्षिणात्य अभिनेत्री आपल्या अभिनयाने, लूकमुळे कायम चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री अमला पॉल हिने देखील अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ती केरळमधील एका हिंदू मंदिराला भेट देणार होती मात्र, ‘धार्मिक भेदभावामुळे’ मंदिरात प्रवेश नाकारला गेला असून, मंदिरातील अधिकाऱ्यांनी रोखले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात अमला पॉल दर्शनासाठी सोमवारी गेली होती. मात्र मंदिर प्रशासनाने या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंना परवानगी आहे. इतरांना दर्शन घेण्याची परवानगी नाही, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अभिनेत्रीने दावा केला की तिला दर्शन नाकारण्यात आले आणि तिला मंदिरासमोरील रस्त्यावरून देवीचे दर्शन घेण्यास भाग पाडले.

अमलाने मंदिरातील एका रजिस्टरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहले आहे की ‘हे दुःखद आणि निराशाजनक आहे की २०२३ मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकत नव्हते, पण दुरुन दर्शन घेऊनही तिची अनुभूती येत होती. मला आशा आहे की धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. अशी वेळ येईल जेव्हा धर्माच्या आधारावर नव्हे तर आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या घटनेनंतर ज्या ट्रस्टद्वारे मंदिराचा कारभार चालवला जातो त्या ट्रस्टच्या विरोधात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. याबाबत बोलताना ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले की, अनेक धर्मातील भाविक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत, परंतू हे कोणालाही माहिती नाही. मात्र, एखादी सेलिब्रिटी आली की ती वादग्रस्त ठरते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा