सुप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी दगडी पाट्यांवर कोरली श्रीगणेशाची रूपे अन् व्यक्तिचित्रे

वर्ष १९९७ मध्ये ‘दगड फूल’ नावाने श्रीगणेशाच्या विविध रूपांचे बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे भरविले होते प्रदर्शन

पिंपरी-चिंचवड, ता. १२ डिसेंबर २०२२ : बुद्धी आणि विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या श्रीगणरायाची आराधना सर्वजण मोठ्या भक्तिभावाने करतात. कलावंत या आराधनेत स्वप्रतिभेची भर घालत असतात. कोणत्याही कलावंताला कायम नावीन्याचा ध्यास असतो. तो वेगवेगळे प्रयोग करीत असतो. कायम वेगवेगळ्या माध्यमांचा विचार करीत असतो. निगडी-प्राधिकरण येथील सुप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर या कलावंताने आपल्या लाडक्या देवतेची- श्रीगणरायाची आराधना अशीच एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केली.

लहानपणी आपण सर्वजणांनी आपल्या विद्येचा श्रीगणेशा ज्या दगडी पाटीवर केला त्या पाटीचा एक नवीन माध्यम म्हणून वापर केला आहे. दगडी पाटीवर दाभण, स्क्रू- ड्रायव्हर यांच्या साहाय्याने चित्रे कोरली आहेत. पाटीच्या काळ्याभोर पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाचा कोरलेला भाग गणरायाच्या रूपाने प्रगट झाला आहे. कोरीव भाग सुरेख पांढुरक्या रंगाचा दिसतो. या सर्व कामात ओघवत्या रेषा व जोमदार आकार यांचा सुंदर मेळ त्यांनी साधला आहे.

श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी सर्वप्रथम जलरंग, ऑईल कलर, ऑईल पेंट, कोलाज, म्युरल्स, ऑईल पेस्टल्स, सूतचित्र आदी अनेकविध माध्यमांत काम करून त्याची ‘आविष्कार’ नावाने प्रदर्शने भरविली होती. वर्ष १९९७ मध्ये सर्वप्रथम ‘दगड फूल’ हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे भरविले. या प्रदर्शनात त्यांना १०१ विविध प्रकारच्या गणपतींची चित्रे काढून या कलेचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून आजपर्यंत काही मान्यवरांनी या प्रदर्शनाबद्दल दिलेले अभिप्राय-

स्वामी स्वरूपानंद : अत्यंत सुंदर.

डॉ. भय्यासाहेब ओंकार : हे प्रदर्शन पाहून फार आनंद वाटला. दगडी पाटीवर चित्र दाभणाने अगर स्क्रू ड्रायव्हरने कोररून एका नव्या माध्यमाची वाट त्यांनी हाताळली. हे शंभर गणेश विविध रूपांत अवतरले आहेत. गणपतीची सर्वच रूपे देखणी आहेत. असे हे अनोखे प्रदर्शन भरविल्याबद्दल अभिनंदन.

शिल्पकार व चित्रकार श्री. प्रमोद कांबळे : अक्षरांचा श्रीगणेशा ज्यावर साकार होतो, त्यावरच साकारलेली ही गणेशरूपे पाहून मन प्रफुल्लित झाले.

श्री विघ्नहरी देव महाराज : चित्रे सुबक आहेत. कलेचा उत्कृष्ट अविष्कार त्यात आहे. गणपतीची वेगवेगळी चित्रे मन आर्कषून घेत आहेत.

दिवंगत खासदार आण्णा जोशी : अतिशय कल्पकतेने व प्रयत्नपूर्वक दगडी पाट्यांवर श्रीगणेशाची विविध रूपे साकारणारी ही कलाकृती कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.

त्यानंतर त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे काढून या कलेतील एक वेगळा पैलू रसिकांसमोर आणला. व्यक्तिचित्रांमध्ये मा. श्री. रतनजी टाटा व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. यातील रतन टाटांचे व्यक्तिचित्र खुद्द मा. श्री. रतनजी टाटा यांना त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या मित्राने भेट दिले, तर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे व्यक्तिचित्र स्वत: श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांना भेट दिले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी कमीत कमी ७५ वंदनीय व्यक्तींची व्यक्तिचित्रे काढून त्यांना आदरांजली वाहण्याचा संकल्प आहे. त्यातील काही वंदनीय व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चंद्रशेखर आझाद, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, साने गुरुजी, रतन टाटा आदींची व्यक्तिचित्रांचे काम पूर्ण झाले आहे. २०२३ मध्ये हे काम पूर्ण होईल व लवकरच ‘वंदनीय ७५’ हे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा