साहित्य अकादमीने सन्मानित केलेले प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गोपीचंद नारंग यांचं अमेरिकेत निधन

US, 16 जून 2022: प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गोपीचंद नारंग यांचं निधन झालं. 91 वर्षीय नारंग यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. नारंग यांचा जन्म 1931 मध्ये बलुचिस्तानमध्ये झाला. 57 पुस्तकांचे लेखक गोपीचंद नारंग यांनाही पद्मभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. उर्दू अफसाना रवायत आणि मसाईल, इक्बालची फन, अमीर खुसरोची हिंदवी कलाम, जबिदियत बाद या त्यांच्या काही प्रमुख कामांचा समावेश आहे.

सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी

हिंदी, उर्दू, बलुची पश्तो यासह भारतीय उपखंडातील सहा भाषांवर नारंग यांचं प्रभुत्व होतं. गोपीचंद नारंग यांनी उर्दू व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेतही पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर शिक्षकही होते. पद्मभूषण व्यतिरिक्त नारंग यांना पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च सन्मान ‘सितार-ए-इम्तियाज’ देखील देण्यात आलाय.

गोपीचंद नारंग यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1931 रोजी बलुचिस्तानमधील दुक्की येथे झाला. 1954 मध्ये दिल्ली विद्यापीठातून उर्दूमध्ये पीजी केल्यानंतर, त्यांनी 1958 मध्ये शिक्षण मंत्रालयाच्या शिष्यवृत्तीसह पीएचडी पूर्ण केली. प्रो. नारंग यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये उर्दू साहित्य शिकवायला सुरुवात केली. काही काळानंतर ते दिल्ली विद्यापीठाच्या उर्दू विभागात रुजू झाले. येथे 1961 मध्ये ते रीडर झाले.

1963 मध्ये त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून योगदान दिलं. 1968 मध्ये या विद्यापीठाने त्यांना पुन्हा शिकवण्यासाठी बोलावलं. याशिवाय त्यांनी मिनियापोलिसमधील मिनेसोटा विद्यापीठ आणि नॉर्वेमधील ओस्लो विद्यापीठातही अध्यापन केलंय.

1974 मध्ये, नारंग यांनी जामिया मिलिया इस्लामिया येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. येथे त्यांनी सुमारे 12 वर्षे अध्यापन केलं. त्यानंतर 1986 मध्ये पुन्हा दिल्ली विद्यापीठातून अध्यापन सुरू केलं. 1995 पर्यंत त्यांनी येथे काम केलं. त्यानंतर 2005 मध्ये दिल्ली विद्यापीठाने त्यांना प्रोफेसर एमेरिटस केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा