शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शासकीय योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘फार्मर आयडी’साठी अर्ज करताना जी शेतकरी खोटी किंवा चुकीची कागदपत्रे सादर करतील, त्यांच्यावर आता कृषी विभाग कठोर कारवाई करणार आहे. अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आयडी चक्क पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार आहे. याचा अर्थ, पुढील पाच वर्षे त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा युनिक ‘फार्मर आयडी’ त्याच्या सातबारा, आधार आणि शेतीविषयक माहितीशी जोडला जातो, ज्यामुळे माहितीचे केंद्रीकरण होते. ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी, महाडीबीटीवरील अर्ज प्रक्रियेत सादर केलेली सातबारा, ८-अ उतारा आणि जात प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे एपीआय (API) प्रणालीद्वारे स्वयंचलितरीत्या पडताळली जाणार आहेत. यासाठी महाआयटीकडून तांत्रिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.
एकीकडे कृषी विभाग फार्मर आयडी काढण्याचे वारंवार आवाहन करत असला तरी, अजूनही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आयडी काढलेला नाही. मात्र, आयडी काढताना किंवा योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांनी खोटी माहिती देणे टाळावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. या नव्या नियमांमुळे योजनेचा लाभ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
