२० मार्चपासून दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलन : राकेश टिकैत यांची घोषणा

12

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी २०२३ :राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील किसान महापंचायतीनंतर २० मार्च रोजी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली शेतकऱ्यांकडून निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केली आहे.

दरम्यान, मुझफ्फरपूरच्या राजकिय इंटर कॉलेजच्या मैदानावर भारतीय किसान युनियनच्या महापंचायतीत हजारो शेतकरी जमले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बाकी देणे, भूसंपादन, एमएसपी आदी प्रश्नांवर जोरदार भाषणबाजी व चर्चा झाली. यावेळी महापंचायतीत भारतीय किसान युनियनने पुन्हा सरकारच्या विरोधात भूमिका मांडत यूपीमध्ये उसाला प्रति क्विंटल ४५० रुपये भाव द्यावा, अशी मागणी केली.

  • पुढील वर्षी २६ जानेवारीला पुन्हा ट्रॅक्टर परेड

राकेश टिकैत म्हणाले की, आमच्या आंदोलनाचा पुढचा मुक्काम दिल्लीत असेल. २० मार्चपासून संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.आम्ही २० वर्षे आंदोलन करण्यास तयार आहोत. पुढील वर्षी २६ जानेवारीला देशभरात ट्रॅक्टर परेड काढण्यात येणार आहे. आम्ही कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नाही.

पुढे ते म्हणाले, यूपीमधील कूपनलिकांवर वीज मीटर कोणत्याही परिस्थितीत बसू दिले जाणार नाहीत. सरकार PAC बोलवू शकते, मिलिटरी बोलवू शकते, पण मीटर बसवणार नाही. चुकीच्या पद्धतीने भूसंपादन होत आहे, जुने ट्रॅक्टर बंद केले जात आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर चर्चा होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.