शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्यात यावा: कानडे

श्रीरामपुर, दि.२७ एप्रिल २०२०: आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर तालुक्यातील खरीप २०२० हंगामाचे नियोजनासाठी आज (सोमवार) रोजी तहसील कार्यालय, श्रीरामपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकरी जालिंदर आभाळे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, कृषी अधिकारी रामराव कडलग, विस्तार अधिकारी गणेश अनारसे, मंडळ कृषी अधिकारी श्री अविनाश चंदन उपस्थित होते.
सोशल डिस्टंसिंगचे पालन करूनच सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार कानडे म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पिक घेतले जाते. याकरिता तालुक्यात सुत गिरणी स्थापन करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, तसेच मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढून पडलेला कांदा काही प्रमाणात भिजला असून हा कांदा साठवणुकीसाठी योग्य नाही. तरी या कांद्याची नाफेडमार्फत खरेदीसाठी योग्य ती कार्यवाही करावी.
तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त दरात खते व बियाणे पुरवठा होईल, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्यात यावा.

शेततळे, ठिबक सिंचन, कृषी अयांत्रिकीकरण योजनेतील ट्रॅक्टर व इतर औजारांचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे अशा सूचना आमदार कानडे यांनी दिल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी -दत्तात्रय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा