नाशिकजवळ भीषण अपघात; कारने घेतली १० फूट हवेत झेप, ३ ठार, तर एक तरुण गंभीर

नाशिक, १ मार्च २०२३ : नाशिकमधील वणी-सापुतारा रस्त्यावर भरधाव वेगात कार चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार हवेत दहा फुटांपर्यंत फेकली गेली. या भीषण रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. ते सर्व सहलीला जात होते. कार चालविणाऱ्या तरुणाचाही मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (ता.२८ फेब्रुवारी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वणी- सापुतारा मार्गावर चौसाळे फाट्यानजीक व्हर्ना कार भरधाव वेगात वणी बाजूकडून सापुताऱ्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून सदर कार रस्त्यालगतच्या शेतात घुसली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी कारने दोन ते तीन वेळा हवेत १० फूट झेप घेतली. अपघातावेळी मोठा आवाज झाला. यानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ कारमधून तिघांना बाहेर काढू वणी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. जखमी तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की, त्याचा आवाज पाचशे मीटरपर्यंत ऐकू आला.

अंजली राकेश सिंग (वय २३, रा. सातपूर), नोमान हाजीफुल्ला चौधरी (२१, रा. सातपूर अंबड लिंकरोड), सृष्टी नरेश भगत (२२, रा. रामबाज स्क्वेअर, नागपूर) अजय गौतम (२०, रा. सातपूर लिंक रोड) हे चौघे त्या कारमध्ये प्रवास करीत होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा