गंगाखेड-सावरगाव रोडवर भीषण अपघात; स्कूल बस-एसटीच्या धडकेत २० जखमी, चार गंभीर

पुणे, ता. ११ डिसेंबर २०२२ : गंगाखेड (ता. परभणी) शहरातील संत जनाबाई विद्यालयाची स्कूल बस आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारजणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले. हा अपघात गंगाखेड-सावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याविषयी अधिक माहिती अशी, की गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन चाकूरकडे जात होती. बस गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ आली असता, अहमदपूरवरून बुलडाण्याला जाणाऱ्या एसटी बसचा आणि स्कूल बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये स्कूल बसमधील विद्यार्थी आणि एसटी बसमधील २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले.

या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे, डॉ. केशव मुंडे, डॉ. योगेश मल्लुरवार आणि रुग्णालयाच्या परिचारिकांनी अपघातातील जखमींवर उपचार केले. अपघातात जखमी झालेल्या चारजणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे, अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बसचालक अडकला केबिनमध्ये
स्कूल बस आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाल्यानंतर एसटी बसचा चालक हा केबिनमध्ये अडकला होता. पिंपळदरी पोलिसांनी आणि नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चालकाने मद्यपान केल्याचा संशय
अहमदपूरवरून बुलडाण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या चालकाने मद्य सेवन केले असल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अपघाताची नेमकी माहिती समोर येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा