केरळमध्ये बसचा भीषण अपघात; ५ शाळकरी मुलांसह ९ जणांचा मृत्यू

पलक्कड, ६ ऑक्टोबर २०२२ : केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये दोन बसची धडक होत भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. केएसआरटीसीची बस पर्यटक बसला धडकल्याने घडलेल्या या अपघातात पाच शाळकरी मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी झाले आहेत.

बसला ओव्हरटेक करताना झाला अपघात

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, वाल्यार-वडकनचेरी मार्गावर सकाळी १२ च्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये पाच विद्यार्थी, केएसआरटीसीचे तीन प्रवासी आणि अन्य एक बस कर्मचारी होते. ही बस केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या बसला ओव्हरटेक करत असताना ती घसरली आणि हा अपघात झाला. या धडकेत दोन्ही बस उलटल्या आणि अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकर्त्यांना दोन्ही वाहने फोडावी लागली.

केरळचे राज्यमंत्री एमबी राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे केएसआरटीसीची बसच्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३८ जण जखमी झाले. पर्यटक बस ही बसलियोस बिद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन एर्नाकुलम येथून उटी येथे जात होती, तर त्याचवेळी केएसआरटीसीची बस कोईम्बतूरच्या दिशेने निघाली होती. या दरम्यान हा भीषण अपघात घडला. दरम्यान, जखमींपैकी काहींची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा