Chakan Triple Seat Bike Accident: चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथे एका हृदयद्रावक अपघातात एका व्यक्तीचा बळी गेला. 15 मार्च रोजी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या ट्रिपल सीट दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत संतोष गणपत जंबुकर (वय ४५, रा. नाणेकरवाडी, खेड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विकास मयाराम अडकमोल (वय २२, रा. बिरदवडी, खेड) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ललित विठ्ठल पाटील (वय २३, रा. खराबवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ललित हा त्याच्या दुचाकीवर विकास आणि रवींद्र गौडा या दोघांना ट्रिपल सीट बसवून वेगात जात होता. त्याचवेळी समोरून संतोष जंबुकर यांची दुचाकी येत असताना ही भीषण धडक झाली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे