कोलकता, २८ जुलै, २०२२ : प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री, मॉडेल अर्पिता मुखर्जी हिच्या घरावर ईडीने छापा घातला. त्यावेळी ईडीला घबाड सापडलं. तिच्या घरातून पाच किलो सोनं, चांदीचे सिक्के आणि तब्बल ३० कोटींची रोकड ईडीला सापडली. तब्बल चार मशिनमधून ही रक्कम मोजल्यानंतर ही रक्कम ३० कोटी असल्याचं ईडीच्या अधिका-यांनी सांगितलं.
अर्पिताच्या कोलकतामधल्या बेलघराई येथील घरावर ईडीने छापा मारल्यानंतर ही संपत्ती ईडीच्या हाती लागली आहे. रात्री छापा टाकण्यात आल्यानंतर व पहाटे चार वाजेपर्यंत नोटांची मोजणी सुरु होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम किती आहे याचा पंचनामा करण्यासाठी चार नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवल्या.
कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून या मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. या छापेमारीनंतर भाजपच्या दिलिप घोष यांनी यामधून कोणीही वाचू शकणार नाही असं म्हटलंय. “पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीचा तपास मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. पार्थ हे सहजासहजी बोलणार नाहीत. पण अर्पिता यांनी माहिती देण्यास सुरुवात केलीय आणि आम्ही हे सारं ऐकतोय,” असं घोष यांनी म्हटलंय. याच तपासात एक डायरी मिळाली असून त्या डायरीत अनेक प्रकारचे महत्त्वाचे धागे-दोरे सापडू शकतात. तिला तीन चित्रपटांमध्ये भूमिका देणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्माता अनुप सेनगुप्ता यांनी सांगितले की, तिने एवढी संपत्ती कशी जमवली हे पाहून मी थक्क झालो आहे. ती सामान्य घरातून आली होती आणि तिच्याकडे सेकंडहँड कार होती. कधी कधी ती शुटिंगला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायची.
अर्पिताच्या आईने यावर सांगितले की, इतके पैसे आपल्या मुलीकडे कुठून आले, ‘एवढी मोठी रक्कम कुठून आणि कशी मिळाली, हे मला माहित नाही. हे सर्व मला माध्यमांतून कळत आहे. ती पूजा कमिटीत होती आणि पार्थ चॅटर्जीला ओळखत होती, हेही मला मीडियाच्या माध्यमातून कळले आहे’. असे स्पष्टीकरण तिच्या आईने दिले आहे.
कोण आहे अर्पिता मुखर्जी…
अर्पिता ही मॉडेल, नेल आर्टिस्ट आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील जेष्ठ नेते पार्थ चटर्जी यांनी नकतळा उदयन संघाची पोस्टर गर्ल म्हणून अर्पिताला संधी दिली. मॉडेलिंग करिअर करत असताना काही प्रसिद्ध कलाकार प्रोसेनजीत चॅटर्जी आणि जीत यांच्याबरोबर तिला बंगाली चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका मिळू लागल्या. त्यांनतर ती चर्चेत आली. आता मात्र तिच्या घरात रोकड सापडल्याने ती प्रत्येकाच्याच नजरेत आली आहे, हे खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस