उस्मानाबाद, दि. ७ ऑगस्ट २०२०: आत्महत्येचे प्रकरण हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील काजळा या गावातील देखील एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे.
माहेराहून वाहन खरेदी करण्याकरिता ६ लाख रूपये आण, असा हट्ट सासरकडच्यांनी संबंधित महिलेकडे लावला होता. तसेच, संबंधित महिलेला तिच्या सासरचे लोक २०१२ सालापासून सतत मानसिक तसेच शारिरीक छळ करत होते. सततच्या या त्रासाला कंटाळून अखेर काल दि. ६ ऑगस्ट रोजी शिल्पा अनंतकुमार लांडगे या महिलेने आत्महत्या केली.
या प्रकरणाबाबत उस्मानाबाद येथीलच अजिंठानगर मधील सुमित अरूण रणखांब यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी संबंधित महिलेच्या सासरकडील लोक आनंदकुमार लांडगे (पती), विलास लांडगे (सासरा), प्रमिला (सासु), हर्षदा आणि प्रतिभा (जावा) दिपक आणि सुधीर (दिर), या सात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ३०४ (ब), ४९८(अ), ३२३, ५०४,३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.