फेव्हिकॉलचा जोड २ महिन्यात तुटणार, शिंदे-फडणवीसांच्या संयुक्त भूमिकेवर राऊतांचा दावा

मुंबई १६ जून २०२३: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मित्रपक्षांवर, विरोधक प्रभावीपणे आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आज धाराशिवमध्ये कार्यक्रमात सहभागी होत असून इकडे पिंपरीतील ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंची मैत्री हे फेव्हिकॉलचे बंधन आहे, कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते तुटणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पालघरच्या सभेत सांगितले होते. त्यावर आज संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि शिंदे गटात सर्व काही ठीक नाही, हा फेव्हिकॉलचा जॉइंट दोन महिन्यात तुटणार आहे.

सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या निशाण्यावर शिंदे सरकार आहे. राज्यात बदली-पोस्टिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू झाल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. सुप्रिया सुळे यांनीही आज पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील अराजकतेचा मुद्दा उपस्थित केला असून, प्रत्येक मंत्र्याला पाच ते दहा खाती देण्यात आली आहेत तसेच राज्यात एक वर्षापासून मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीए, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. महापालिकेत आयुक्त नाहीत. मंत्रालयात मंत्री नाहीत. कोणत्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार थांबतोय? स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका का घेतल्या जात नाहीत? असे मुद्द्याचे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी मांडले.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, एकीकडे अजित पवारांचे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू झाल्याचे म्हणणे आहे, पण शिंदे आपल्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई कशी करणार? एकनाथ शिंदे हे आपल्या ४० आमदारांवर अवलंबून असल्यामुळे त्यांचे हात बांधले गेलेत. ते त्यांच्यावर कोणतीच कारवाईही करू शकत नाहीत कारण ते त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री झाले आहेत. दुसरीकडे असे कळते कि, केंद्र सरकारने एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आधी तुमच्या भ्रष्ट मंत्र्यांना हटवा, मगच मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी दिली जाईल. एकनाथ शिंदे यांचे हात चारही बाजूंनी बांधलेले आहेत. मुख्यमंत्री असूनही ते स्वतंत्र राहून मंत्रिमंडळाचा विस्तारही करू शकत नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा