फुग्यांमध्ये गॅस भरताना हायड्रोजन टाकीचा स्फोट

30

सोलापूर : सोलापूर येथील डफरीन चौक येथे मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्‌घाटनावेळी हवेत सोडण्यासाठी लागणाऱ्या फुग्यांमध्ये गॅस भरताना अचानक टाकीचा स्फोट होऊन गॅस भरणारा आणि अन्य पाच असे एकूण सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना रविवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडली आहे. या स्फोटाने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्फोटात चंद्रकांत भिमण्णा खडाखडे (वय ३६, रा. सोरेगाव, तालुका उत्तर सोलापूर), शमशुल अहमद सुलेमान शेख (३४), गोपाळ मुंदडा (२९), मानसी दिपक मुंदडा (२०), विनायकसिंग छोटूसिंग परदेशी (३०) आणि हरिदास मोहन माने (२०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसा, रविवारी पहाटे सोलापुरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी या परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक धावपटू जमा झाले होते. दरम्यान, अचानक गॅसचे फुगे भरताना टाकीचा स्फोट झाला.या स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने एकच गोंधळ उडाला. यात ६ जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बॉम्ब शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. गर्दी नसल्याने मोठा अनर्थ होण्यापासून टळला.