मणिपूर, २२ जुलै २०२३ : दोन महिलांच्या अत्याचार प्रकरणी आज पाचव्या आरोपीलाही पोलिसांनी मणिपूरमध्ये अटक केली. काल शुक्रवार, २१ जुलैपर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली होती. १९ जुलै रोजी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन महिलांवर अत्याचार करण्यात आले होते. या लाजिरवाण्या घटनेवर देशभरातून टीका होत आहे.
माहितीनुसार, पाचव्या आरोपीचे नाव यमलेम्बम नुंगसिथोई मेटाई असे आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी आणि दुःख व्यक्त केले आहे.
यासोबतच पंतप्रधानांनी या घटनेचा निषेध करताना असंही म्हटलं की, या घटनेने संपूर्ण देशाची बदनामी झाली असून दोषींना सोडले जाणार नाही. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना काल शुक्रवारी ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. खरे तर आसाममधील विरोधी पक्षाने या घटनेसाठी आणि राज्यात सुरू असलेल्या अशांततेसाठी थेट मणिपूर सरकारला जबाबदार धरले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड