किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लढा उभारणार : संभाजीराजे यांचा राज्य सरकारला इशारा

भिगवण, १७ फेब्रुवारी २०२३ : गडकोट किल्ल्यांसाठी सी पोर्ट सर्किट टुरिझम करा, यासाठी आजी-माजी मुख्यमंत्र्यांना शेकडो पत्रे लिहिली; मात्र लोकांना फसविण्याचा प्रकार होत आहे. किल्ले संवर्धन व जतन करण्यासाठी सरकारचा एक पैसा नको. केवळ किल्ले आमच्या ताब्यात द्या, असा घणाघात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला. किल्ले संवर्धन व जतन करण्यासाठी सरकारने दोन-तीन महिन्यांत निर्णय न घेतल्यास मोठा लढा उभारू, असा इशाराही भिगवण येथे दिला आहे.

संभाजीराजे भिगवण येथे राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेसाठी आले होते. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप, राजकुमार मस्कर, छगन वाळके आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. ज्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल, जिथे राज्याभिषेक झाला, महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्यांबाबत साधी चर्चा होत नाही.

अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले; मात्र त्यांच्या कार्याची दखल घ्यायला सरकारला वेळ मिळत नसल्याची टीका त्यांनी केली. रायगड हे श्रद्धास्थान असल्याचे फक्त म्हटले जाते; परंतु त्याला जीवित ठेवण्याचा प्रयत्न केला जात नाही. आता स्वराज्याच्या माध्यमातून बिघडलेल्यांना सरळ करण्याचे काम करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा