कोलकता विमानतळावर अचानक उतरले ‘फायटर जेट’, काय आहे प्रकरण?

कोलकता, १२ ऑगस्ट २०२२: मंगळवारी कोलकत्याच्या आकाशात फायटर जेटची गर्जना ऐकली तेव्हा तेथील नागरिकांचा स्वतःवर विश्वासच बसला नाही. कोलकत्याच्या न्यू टाऊन विमानतळाच्या आसपास, जेव्हा अचानक युद्ध विमानांचा आवाज ऐकू आला, तेव्हा लोकांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्हीची भावना होती. शेवटी, लढाऊ विमानं कोलकत्यात काय करत आहेत? या प्रश्नानं सर्वांनाच घेरलं.

मंगळवारी दुपारपासून दक्षिण कोरियाच्या ९ ब्लॅक ईगल विमानांनी कोलकत्यात तळ ठोकला आहे. पण ही कोणत्याही प्रकारच्या युद्धाची सुरुवात नाही. हे फायटर जेट इथं विमानतळाच्या ऍप्रन परिसरात उभे आहे. ही सर्व कोरियन लढाऊ विमानं (T50B) आहेत. काळ्या आणि पिवळ्या विमानांवर मोठ्या अक्षरात ब्लॅक ईगल लिहिलेलं आहे.

आता प्रश्न असा आहे की, युद्ध नसताना अचानक ही लढाऊ विमानं कोलकता विमानतळावर काय करत आहेत? याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून उत्तरं मिळाली. या विमानांना विमानतळ आश्रय देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बुधवारी कोलकता विमानतळ प्राधिकरणाने याबाबत एक ट्विटही केलंय. त्यानुसार ही कोरियन लढाऊ विमानं कोलकता विमानतळावर इंधन भरण्यासाठी आणि वैमानिकांच्या आरामासाठी उतरली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा