राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्ध, परिस्थिती गंभीर, डॉक्टर म्हणाले- मेंदूवर परिणाम

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट २०२२: कॉमेडीचा बादशाह म्हटल्या जाणार्‍या राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत एक मोठं अपडेट समोर आलंय. राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. २४ तासांनंतरही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे.

चिंताजनक स्थिती

एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूला हृदयविकाराच्या झटक्यानं मोठं नुकसान झालं. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जशी होती तशीच असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने सांगितलं की, “त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आयसीयूमध्येच डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी संपूर्ण वैद्यकीय पथक प्रयत्नशील आहे. आम्ही फक्त प्रार्थना करत आहोत आणि आशा करतो की ते लवकर बरे होईल. सध्या माझी आई त्यांच्यासोबत आयसीयूमध्ये आहे.

राजू फिटनेसची काळजी घेत असे

अंतराने सांगितलं की, माझे वडील अनेकदा दिल्लीहून इतर ठिकाणी जातात. त्यामुळंच त्यांनी ठरवलं होतं की चांगल्या आरोग्यासाठी त्यांना रोज वर्कआउट करायचं आहे. ते रोज जिम मध्ये जायचे, रोज व्यायाम करायचे. कधीही व्यायाम चुकवला नाही. त्यांना हृदयविकार नव्हता. ते एकदम ठणठणीत होते. त्यामुळंच हे सर्व अतिशय धक्कादायक दिसतं.

राजू श्रीवास्तव यांच्या देखरेखीसाठी एम्सच्या डॉक्टरांची टीम व्यस्त आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण यावेळी प्रार्थना करत आहेत. बुधवारी, राजू श्रीवास्तव यांचा जवळचा सहकारी सुनील यानेही सोशल मीडियावर चाहत्यांसह त्यांचे आरोग्य अपडेट शेअर केले. यासोबतच लोकांना त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यासही सांगण्यात आलं.

राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर ते बिग बॉस सीझन ३ मध्येही दिसले. राजू हे कॉमेडी शो महामुकाबलाचाही भाग होते. राजू आपल्या पत्नीसोबत नच बलिएच्या सीझन ६ मध्ये देखील दिसले आहे. या सर्वांशिवाय राजू यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटही केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे