जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

10

उस्मानाबाद, दि.१८ मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनचे तंतोतंत नियम बनवले आहेत. यामध्ये सर्वत्र पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी कार्यरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये जनावरांना घेऊन जाणारा टेम्पो (दि.१७) रोजी पोलिसांनी पकडून त्या जनावरांची सुटका केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत खानापूर येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. रविवारी (दि.१७) रोजी दुपारी २ च्या दरम्यान या चेकपोस्टवर आयशर मिनी ट्रक क्रमांक एम. एच. १३ ए. एक्स. ४०५० आला. त्या गाडीवर पुढील बाजूला काचेवर अत्यावश्यक वस्तू वाहतूक पुरवठा असा कागद चिकटवलेला होता. चेकपोस्टवर असणारे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे व पोलीस पथकास संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाची तपासणी केली.
तपासणीनंतर त्या वाहनात त्यांना गोवंशीय व म्हैस अशी लहान मोठी एकुण ३१ जनावरे दाटीवाटीने कोंबून कत्तल व मांस विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले. काही जनावरांचे तोंड चिकटपट्टीने बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या जनावरांची सुटका केली.

पोलिसांनी या प्रकरणी असिफ यासीन कुरेशी, अबु फिरोज कुरेशी आणि वाहन चालक अशा तिघांविरूद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध कायदा सह प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.