बारामती : २३ जुलै २०२० : चारचाकी गाडी चोरीला गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे उकळण्याचा कट केलेल्या गाडी मालकाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारचाकी गाडीचा इंशयूरन्स मिळावा या हव्यासापोटी जमाल मोहम्मद अब्दुल सय्यद (वय ४० वर्ष रा. महादेव मळा पाटस रोड बारामती ) यांनी हे कृत्य केले.
या प्रकरणाची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे, सय्यद याने दि. २८ जून २०२० रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी गावाच्या हद्दीतून तांदुळवाडी ते एअरपोर्ट कडे जाणाऱ्या रस्त्यावरून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (MH 42 AH 7074 ) गाडी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली होती.या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तालुका पोलिसानी या चोरीला गेलेल्या गाडीचा शोध घेण्यासाठी आसपासच्या सर्व पोलीस स्टेशनला वायरलेस वरून सूचना दिल्या. तसेच सी. सी. टि. व्ही. फुटेज चेक केले. चारचाकी चोरीतील संशयित लोकांकडे कसून चौकशी केली,मात्र चोरीला गेलेल्या गाडीचा काही सुगावा लागत नव्हता.
गुन्हे शोध पथकाने कसून चौकशी करत तांत्रिक बाबींची मदत घेतल्यावर असे लक्षात आले की फिर्यादी जो रस्ता सांगत आहे त्या रस्त्याकडे तो सांगत असलेल्या तारखेला गाडी घेऊन गेलाच नाही. या बाबत सय्यद यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर असे समजले की सय्यद याने इंश्यूरन्स क्लेम मिळवण्यासाठी त्याची गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. सय्यद याने पोलिसांकडे याबाबत कबुली जबाब दिला आहे.
या सर्व तपास कामात पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लांगूटे,पोलीस हवालदार पोपट दराडे,नंदू जाधव,विनोद लोखंडे,मंगेश कांबळे सहभागी होते.
न्युज अनकट प्रतिनिधी :अमोल यादव.