परळी, दि.५ जून २०२० : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने मागील तीन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाल्याने जनता संकटात असतानाच शहरातील सर्वच शासकीय यंत्रणा कोलमडून गेली आहे. सलग तिन दिवसांपासून संपूर्ण शहर विजेच्या लपंडावामुळे काळोखात जात असल्याने उकाड्याच्या त्रासाने जनता हैराण झाली आहे .
तर दुसरीकडे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या तुंबल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला गटाराचे स्वरूप आले आहे. तर विकास कामाच्या नावाखाली खोदलेले रस्ते आणि मातीचे ढिगारे जाग्यावरच पडून आहेत. सध्या पावसाळा सुरु झाल्याने साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शहराला गटाराचे स्वरूप आले असून अनेक साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता आहे.
तर सर्वच अवैधधंदयांनी शहरात धुमाकूळ घातला आहे.एकंदरीतच या सर्व समस्यांवर आला घालणाऱ्या सर्वच शासकीय यंत्रणा कोलमडून गेल्याची परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. अश्या अनागोंदी कारभारावर या शहराचे आमदार आणि पालकमंत्री या नात्याने तात्काळ लक्ष घालून ढासळलेला कारभार थांबवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: