अखेर ४ वर्षाच्या वादानंतर टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यातील संबंध संपुष्ट

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर २०२०: टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यात गेल्या जवळपास ४ वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून काढून टाकलं गेलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. टाटा सन्समधील मिस्त्री ग्रुप कंपनीचा सर्वात मोठ्या भागधारक आहेत.

टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाचा वाटा १८.५ टक्के आहे. टाटा सन्समधील आणखी एक समूह शापोरजी पालोनजी (एसपी) समूहाला आपला हिस्सा विकायचा आहे, तर टाटा समूह हे भाग भांडवल खरेदी करण्यास तयार आहे. टाटा सन्समधील एसपी समूहाची हिस्सेदारी सुमारे १.३ लाख कोटी रुपये आहे.

 

टाटा सन्समध्ये हिस्सा विकून बाहेर पडायला तयार असल्याचं शापोरजी पालोनजी समूहानं मंगळवारी सांगितलं. कंपनीनं एक निवेदन जारी केलं की, ‘शापोरजी पालोनजी आणि टाटा सन्स यांचं ७० वर्ष जुनं नातं आहे आणि हे म्यूचुअल ट्रस्ट, विश्वास आणि मैत्रीवर आधारित होतं.

त्याच वेळी टाटा समूहानं मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, जर शापूरजी पालनजी समूहाला निधी हवा असेल आणि टाटा सन्समधील आपला हिस्सा विकायचा असेल तर टाटा समूह हा भाग खरेदी करण्यास तयार आहे. शापोरजी पालनजी ग्रुप आता टाटा सन्समधील आपला हिस्सा विकून निधी गोळा करणार आहे.

 

मिस्त्री परिवारानं सांगितलं की टाटा सन्समधून बाहेर पडणं भागधारकांच्या हिताचं आहे. टाटा समूहापासून वेगळं होणं आवश्यक आहे, असे कायदेशीर युद्धात केवळ आर्थिक नुकसान होईल, असं शापोरजी पालनजी समूहानं सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एसपी समूहानं टाटा सन्समधील आपल्या भाग भांडवलाचं मूल्य सुमारे १.७५ लाख कोटी रुपये ठेवलं आहे.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, टाटा सन्समध्ये शापोरजी पालोनजी ग्रुपची सायरस इन्व्हेस्टमेंट आणि स्टर्लिंग इनव्हेस्टमेंट या दोन सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून एकूण १८.४ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्सचा उर्वरित हिस्सा टाटा ग्रुपनं टाटा ट्रस्ट व अन्य ग्रुप कंपन्यांच्या माध्यमातून घेतला आहे.

 

मंगळवारी सुप्रीम कोर्टानं शापोरजी पालोनजी यांचे टाटा सन्स मधील शेअर्स विकण्यास २८ ऑक्टोबरपर्यंत बंदी घातलीय. यासह, २८ ऑक्टोबरपर्यंत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय २८ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी घेईल. ५ सप्टेंबर रोजी टाट समूहानं शापोरजी पालनजी ग्रुपचे शेअर्स तारण ठेवण्यावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

मिस्त्री कुटुंबातील सर्वात महत्वाचा सदस्य असलेल्या सायरस मिस्त्री यांना २०१२ साली टाटा सन्सचे अध्यक्ष केले गेले होते, परंतु २०१६ मध्ये त्यांना या पदावरून काढून टाकलं गेलं. यानंतर दोन्ही बाजूंनी दीर्घ कायदेशीर लढाई सुरू झाली, जी अजूनही चालू आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा