अखेर कोल्हापुरात चित्रीकरण करण्यास परवानगी

कोल्हापूर, दि. २५ मे २०२०: काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकारांनी चित्रीकरण सुरू करण्याबाबत विनंती केली होती. त्याचबरोबर स्थानिक चित्रीकरणासाठी देखील अनेक कलाकारांकडून मागण्या केल्या जात होत्या. त्यांच्या या मागणीला आता यश आल्याचे दिसत आहे. पुणे आणि मुंबई शहरांमधील रखडलेल्या चित्रीकरणाच्या कामाची सुरुवात कोल्हापूरमध्ये करण्यात यावी याबाबतच्या कलाकारांच्या धडपडीला आता यश आलेले दिसत आहे.

ऑरेंज झोनच्या निकषानुसार कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्यात यावे यासाठीचे अधिकृत पत्र पालक मंत्री सतेज पाटील यांनी दिले आहे. मुंबई आणि पुणे येथील चित्रीकरण क्षेत्रातील व्यवसायिकांनी लॉक डाऊन मधील सर्व नियमांची पूर्तता केल्यावर त्यांना चित्रीकरणाची परवानगी देण्यात येणार आहे.

शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरू करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधी सूचनेचा आधार घेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी चित्रीकरणासाठी शनिवारी परवानगी दिली होती. या परवानगीनुसार स्थानिक चित्रीकरण, लघु चित्रपट, जाहिराती पोस्टर, वेबसाइट, मालिका इत्यादी कामे सुरू केले जाऊ शकतात.

मुंबई आणि पुणे रेड झोन मध्ये असल्यामुळे येथील १४ प्रोजेक्टसने कोल्हापूर मध्ये येण्याची तयारी दर्शवली होती. तयारी दर्शविलेल्या या सर्व निर्मात्यांना व कॉर्पोरेट कंपन्यांना परवानगी पाठवण्यात आली आहे. रविवारपासून ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा