रत्नागिरी, २२ ऑक्टोंबर २०२२: माजी मंत्री अनिल परब यांचं साई रिसॉर्ट पडणार, हे आता निश्चित झालेलं आहे. बांधकाम विभागाने यासंदर्भात जाहिरात दिली आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचा कालावधीदेखील निश्चित करण्यात आलेला आहे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रिसॉर्टसंबंधी आक्षेप घेतलेला होता.
अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे साई रिसॉर्ट आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टसंबंधी आक्षेप घेतलेले होते. पर्यावरणीय नियमांचा भंग केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केलेला. परंतु हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं असलं तरी हे रिसॉर्ट परब यांचंच असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे.
चिपळूणच्या बांधकाम विभागाने या रिसॉर्टची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते अनधिकृत ठरवलं आहे. आज चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देत रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी तीन महिने ठेवण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. या पाडकामाचं टेंडर बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेलं आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट एनएक्सचे बांधकाम, पोचरस्ता, कंपाऊड वॉल, इमारतीच्या भिंती पायापर्यंत पाडायच्या आहेत. तसेच रिसॉर्ट पाडल्यानंतर उरलेला सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून त्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर रिसॉर्ट पाडलेल्या जागेचं सपाटीकरण करायचं आहे, कामाची अंदाजित रक्कम ४३ लाख २९ हजार ८ रुपये ठरवण्यात आलेली आहे. असं या टेंडरमध्ये कामाचं स्वरुप देण्यात आलेल आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही जाहिरात आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी हे टेंडर ओपन झालं आहे. तसेच रिसॉर्ट पाडण्याचं काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सोमय्या यांनी साई रिसॉर्टच्या बांधकामावर आक्षेप घेतला आणि पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करून हे रिसॉर्ट बाधण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट पाडण्यासाठी हे प्रकरण सोमय्या यांनी उचलून धरल्याने परबांचं रिसॉर्ट पाडण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे