अखेर गिरीश बापट प्रचाराच्या मैदानात उतरणार; आज सायंकाळी कसबा मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

पुणे, १६ फेब्रुवारी २०२३ : खासदार गिरीश बापट शांत राहिल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. कसबापेठ मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले विद्यमान खासदार गिरीश बापट शेवटी आज प्रचारासाठी बाहेर पडणार आहेत. बापट प्रचारात उतरले नसल्याने भाजपमध्ये अस्वस्थता होती, तर विरोधकांना हायसे वाटत होते. बापट यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रक प्रसिद्धीस देत त्यांच्या आजारपणाची माहिती लोकांना दिली होती.

बापट, टिळक यांची नाराजी, ब्राह्मण समाजाला नाकारलेली उमेदवारी यामुळे भाजपची हक्काची मतपेटी असलेल्या ब्राह्मण समाजाचे मतदार काय करणार, हाच प्रश्न माध्यमांकडून वारंवार भाजपच्या नेत्यांना विचारला जात होता. बापट यांनी त्यांची सून स्वरदा यांना कसबापेठ मतदारसंघातून उमेदवारी मागितल्याची चर्चा सुरू होती. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश किंवा पुत्र कुणाल यांच्या नावांची चर्चा होती; मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुकते माप हेमंत रासने यांच्या पारड्यात पडले, त्याचवेळी महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरसारखा तगडा कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरविला. त्यांच्यामागे सर्वांनी थेट ताकद उभी केल्याने भाजपला गेली पाच वर्षे सोप्या ठरलेल्या या बालेकिल्ल्यात घाम फुटला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या शनिवारी महाशिवरात्रीला बापट यांना भेटण्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून गेले. फडणवीस काल त्यांना भेटले. भाजपचे एवढे नेते भेटण्यास येत असल्याने बापट प्रचारास उतरण्यास राजी झाले. ते आज सायंकाळी मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा