मुंबई, २० जुलै २०२२: ओबीसी आरक्षणाचा राजकीय मार्ग आज अखेर मोकळा झाला. सुप्रिम कोर्टानं बाठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार ओबीसींना आरक्षण देऊन मगच निवडणुका घेण्याचे आदेश निवडणुक आयोगाला दिले आहे. दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ओबीसी वर्गात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
पण या निर्णयानंतर श्रेयवादावरुन चढाओढ सुरु आहे.
हा आरक्षणाचा निर्णय शिंदे-फडणवीस गटानं घेतला, असं म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे फडणवीस गटाचे आभार मानले. तर दुसरीकडे हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकारचा पायगुण चांगला, असं म्हणत आनंद व्यक्त केला. तर महायुतीने शब्द पाळला, असं म्हणत महायुतीचे आभार मानले. देवेंद्र फडवीसांनी पुरामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली.
छगन भुजबळ यांनी या निर्णयाचे श्रेय घेतले, तर जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयाने ओबीसींच्या बाजूने निकाल दिल्याची प्रतिक्रीया दिली.
ओबीसी आरक्षण मिळणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय हा जरी आनंदाचा असला तरी प्रत्येक जण याचे श्रेय घेण्यासाठी झटत आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे गट दोघांमध्ये याची चुरस आहे. हा निर्णय शिंदे गटाने लावला, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. पण महाविकास आघाडीने यासाठी पावलं उचलली होती, असे मत आघाडीने निर्माण केले आहे.
त्यामुळे कोणी निर्णय घेतला आणि कोण जिंकलं हे राजकारणात सांगणं सध्या तरी कठीण आहे. पण एक मात्र यामुळे ओबीसी आरक्षण यात जिंकले, हेच सत्य आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस