कुरकुंभ, २० ऑगस्ट २०२० : कुरकुंभ ता.दौंड येथे गायरान जमिनीची मोजणी करून त्यावर प्रशस्त सचिवालय उभारण्याची योजना आखण्यात आली आहे त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा विषय मार्गी निघणार असल्याचे चित्र दिसत असले तरी अजून अनेक अडथळे पार पाडावे लागणार आहे.
ग्रामपंचायत कालावधी २००८ ते २०१३ च्या शेवटी ग्रामपंचायतची जुनी असणारी इमारत पाडून नवीन बांधकामाचे भूमीपूजन तत्कालीन सरपंच पुष्पा सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र यामध्ये अनेक प्रकारच्या प्रशासकीय,राजकीय,तांत्रीक व अन्य अडचणी निर्माण झाल्याने काम रखडले गेले.अनेक वर्षे कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरते हलवण्यात आले तेथे देखील शाळेच्या आवारात विविध प्रकारे अडचणी निर्माण होत असल्याने शेवटी कुरकुंभ गावातील युवकांसाठी व्यायाम शाळेची अर्धवट असणाऱ्या इमारतीला पूर्ण करून यामध्ये कार्यालय स्थापन करण्यात आले व आज पर्यंत ते यामध्ये स्थितीत आहे.
दरम्यान कुरकुंभ गावातील औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून वाढत्या लोकसंख्या व नागरीकरणाच्या समस्या निर्माण होत असताना या ठिकाणी ग्रामपंचायत, तलाठी,भूमी अभिलेख व इतर प्रशासकीय कामासाठी लागणारी कार्यालये अपुरी पडत आहे त्यामुळे एका प्रशस्त जागेत सचिवालयात ही कार्यालये तयार करण्यात यावी याबाबत अनेक वेळा चर्चा घडू लागल्या होत्या त्याला अनुसरून कुरकुंभ येथे असणाऱ्या शिल्लक गायरान जागेची मोजणी करून यावर व्यावसायिक गाळे व कार्यालये उभारण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी












































