अखेर आरंभ… या कंपनीने सरकारसोबत सेमीकंडक्टर प्लॅन्ट उभारण्यासाठी केला करार

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२२: आता भारत सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेणार आहे. अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत समूह आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीने सेमीकंडक्टर (Semiconductor Manufacturing) आणि डिस्प्ले एफएबी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत दोन सामंजस्य करार केले आहेत.

वेदांत १.५४ लाख कोटींची करणार गुंतवणूक

गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. गुजरातमध्ये हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी दोन्ही कंपन्या १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळं राज्यात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असेही मुख्यमंत्री पुढं म्हणाले.

१ लाख लोकांना मिळेल रोजगार

सेमीकंडक्टर प्रकल्प उभारून गुजरातमध्ये डिस्प्ले एफएबी मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारल्यास सुमारे १० लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं मुख्यमंत्री पटेल म्हणाले. यासाठी दोन्ही कंपन्यांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असंही ते पुढं म्हणाले. उल्लेखनीय म्हणजे, या वर्षी फेब्रुवारीमध्ये, वेदांतने फॉक्सकॉनसह संयुक्त उपक्रमात प्रवेश केला होता आणि भारत सरकारच्या सेमीकंडक्टर उत्पादन योजनेसाठी अर्ज केला होता.

अनिल अग्रवाल यांनी केलं हे ट्विट

वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून या कराराची माहिती दिलीय. त्यांनी लिहिलं, ‘ऐतिहासिक प्रसंग, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की गुजरातमध्ये नवीन वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट उभारला जाईल. वेदांता समूहाची १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारताची आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल.

वेदांत ग्रुपचा ६०% हिस्सा

बिझनेस टुडेच्या म्हणण्यानुसार, वेदांत आणि फॉक्सकॉनच्या या संयुक्त उपक्रमात, अनिल अग्रवाल यांच्या समूहाचा ६० टक्के वाटा आहे, तर फॉक्सकॉनचा ४० टक्के वाटा आहे. त्यात पुढील दोन वर्षांत सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारले जाण्याची अपेक्षा आहे. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे या कराराची माहिती दिलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा