अखेर केंद्राकडून ‘काऊ हग डे’ चे आवाहन मागे!

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी २०२३ भारताच्या पशु कल्याण बोर्डाने १४ फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. आता केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर बोर्डाने हे आवाहन मागे घेतले आहे. बोर्डाकडून आवाहन करण्यात आले होते की, १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा केला जावा. गाईंना मिठी मारावी असे बोर्डाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर हे आवाहन बोर्डाने मागे घेतलं आहे.

जगभरात विशेषत: पाश्चात्य देशात १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. मात्र भारतात काही धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांनी याला विरोध केला. अनेक संघटनांकडून १४ फेब्रुवारीला दुसरा कोणतातरी दिवस साजरा करण्याचेही आवाहन करतात. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच भारतात सरकारी संघटनेकडून १४ फेब्रुवारी या दिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करावा असे आवाहन केले होते. मात्र, याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला.

वाढत्या विरोधानंतर पशु कल्याण बोर्डाने त्यांचे आवाहन करणारे निवेदन मागे घेतले आहे. याबाबत माहिती देताना पशु कल्याण मंडळाचे सचिव एसके दत्ता यांनी सांगितले की, डेअरी आणि पशु पालन मंत्रालयाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. आम्ही पशु पालन विभाग ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन मागे घेतो.

दरम्यान, विरोधी पक्षांकडून अशा प्रकारच्या आवाहनावर सडकून टीकाही करण्यात आली. शेवटी मंत्रालयाकडून बोर्डाला त्यांचे आवाहन मागे घेण्याचे आदेश देण्यात आले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा