अखेर अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश; मानधनात वाढ, मोबाईल मिळणार, पेन्शन योजना सुरू करणार

4

मुंबई, १ मार्च २०२३ : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या; मात्र आता या मागण्यांबद्दल राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून, अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे; तसेच त्यांना मोबाईल फोनही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील अंगणवाडी सेविकांनीही गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरवात केली होती. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील जवळपास १६ जिल्ह्यांहून अधिक जिल्ह्यांत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बेमुदत काम बंद सुरू केले होते. मानधन वाढीसह इतर काही प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संपाचे हत्यार उपसले होते.

राज्य शासन आणि अंगणवाडी सेविका यांच्यामध्ये नुकतीच मानधन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. दीड हजाराची मानधन वाढ देण्यात आली आहे. सोबतच अंगणवाडी सेविकांना मोबाईलही दिले जाणार आहेत. एवढेच नाही तर अंगणवाडी सेविकांना सेवा समाप्तीनंतर लवकरच पेन्शन योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे; मात्र ही पेन्शन योजना अंगणवाडी सेविका आणि राज्य सरकार यांच्या समभागातून सुरू होणार आहे.

एकंदरीत अंगणवाडी सेविकांचा संप त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून, त्यांनी उभारलेला लढा यशस्वी झाला आहे. राज्यात सध्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे मागणीपत्र सादर केली जात आहेत. तर काही कर्मचारी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करत आहेत.

दरम्यान, आता मार्च महिन्यात सर्व राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे या काम बंद आंदोलनाचा काय परिणाम होतो, राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी मान्य होते का?, शासन यावर नेमका काय तोडगा काढते? याकडे देखील आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा