पुणे, ७ मार्च २०२३ : थकीत बिलापोटी ६६ कोटी मिळाल्यानंतर ‘पीएमपीएमएल’च्या ‘ओलेक्ट्रा’, ‘ट्रॅव्हल टाइम’, ‘अँथनी’ व ‘हंसा’ या चार कंपन्यांच्या कंत्राटदारांनी
सोमवारी (ता. ६) रात्री अखेर संप मागे घेतला. दोन दिवस चाललेल्या संपात सुमारे ८ लाख प्रवाशांना फटका बसला. उर्वरित रक्कम देखील लवकरच दिली जाणार आहे. मंगळवारपासून (ता. ७) ‘पीएमपीएमएल’ची बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. संप मिटल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘पीएमपीएमएल’च्या चार कंत्राटदारांचे ४ महिन्यांचे ९९ कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी (ता. ५) दुपारपासून त्यांनी संप सुरु केला. संपात सुमारे ९०७ बस सहभागी झाल्याने रविवारी व सोमवारी मोठ्या प्रमाणात ‘पीएमपीएमएल’ची प्रवासी सेवा बाधित झाली होती. सोमवारी (ता. ६) पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९० कोटी रुपये पीएमपी प्रशासनाला दिले.
यात पुणे महापालिकेने ५४ कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३६ कोटी रुपये दिले. त्यापैकी कंत्राटदारांचे ६६ कोटी रुपये देण्यात आले, तर २४ कोटी रुपये हे ‘एमएनजीएल’चे देण्यात येणार आहेत. कंत्राटदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. पैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल सोमवारी (ता. ६) देण्यात आले. संपात ‘ओलेक्ट्रा’, ‘ट्रॅव्हल टाइम’, ‘अँथनी’ व ‘हंसा’ या चार कंपन्यांच्या कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता.
दरम्यान, ‘पीएमपीएमएल’ची बससेवा पूर्ववत व्हावी, याकरिता सोमवारी (ता. ६) विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन चर्चा केली. यात आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे आदींनीदेखील भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील