पुणे, ११ फेब्रुवारी २०२३ : एका नामांकित फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने कंपनीची ३१ लाख ३४ हजार ९९३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना बनावट पावत्या हवाली केल्यानंतर जमा झालेली रक्कम कंपनीच्या खात्यावर न भरता ही फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी नीलेश वावरे (वय ३७, रा. विश्रांतीवाडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रफुल्ल चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी येथे या नामांकित फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी हा कंपनीत कलेक्शन मॅनेजर म्हणून काम करीत होता. त्याने ग्राहकांकडून वेळोवेळी थकीत कर्जाचा हप्ता व कर्ज प्रकरणे बंद करण्यासाठी विविध ग्राहकांकडून ३१ लाख ३४ हजार ९९३ रुपये घेतले आहेत. ती रक्कम कंपनीत जमा न करता वैयक्तिक कुठे जमा करीत होता, हे समोर आलेले नाही. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भांडवलकर करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर