नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२०: एचसीएल टेक्नोलॉजीजच्या चेअरपर्सन ३८ वर्षीय रोशनी नाडर मल्होत्रा सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत. कोटक वेल्थच्या सहकार्यानं हरुण इंडियानंं १०० भारतीय श्रीमंत महिलांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये समाविष्ट महिलांची एकूण मालमत्ता २.७२ लाख कोटी आहे.
रोशनी यांची एकूण संपत्ती ५४,८५० कोटी रुपये
हुरुन रिच लिस्टनुसार रोशनी या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. रोशनी नाडर मल्होत्रा यांच्याकडं एकूण ५४.८ हजार कोटींची संपत्ती आहे, त्यांना अलीकडंच एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष केले गेले आहे. सन २०१९ मध्ये, फोर्ब्स वर्ल्डच्या १०० सर्वाधिक शक्तिशाली महिलांच्या यादीत त्या ५४ व्या स्थानावर होत्या. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्या कंपनीच्या सीईओ बनल्या.
किरण मजुमदार-शॉ हरुण रिच लिस्टमध्ये दुसर्या क्रमांकावर आहेत, ज्यांची एकूण मालमत्ता ३६.६ हजार कोटी आहे. किरण मजुमदार शॉ बायोकॉनच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. अहवालात असं म्हटलं आहे की, यापैकी ३१ महिला अशा आहेत ज्यांनी स्वतःहून हे स्थान मिळवलं आहे.
लीना गांधी तिवारी तिसर्या क्रमांकावर असून त्यांची एकूण मालमत्ता २१,३४० कोटी आहे. त्या यूएसव्ही कंपनीच्या अध्यक्ष आहेत. युएसव्ही इंडियाची स्थापना १९६१ मध्ये लीना तिवारी यांचे वडील विठ्ठल गांधी यांनी केली होती.
नीलिमा मोटापार्टी हुरुन रिच लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण मालमत्ता १८,६२० कोटी रुपये आहे. त्यांची कंपनी डिव्हिस लॅबोरेटरीज आहे. राधा वेम्बु पाचव्या क्रमांकावर असून ज्यांची एकूण मालमत्ता ११,५९० कोटी रुपये आहे. त्या जोहो कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
श्रीमंत महिलांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर जयश्री उल्लाल आहेत, ज्यांची एकूण मालमत्ता १०,२२० कोटी रुपये आहे, त्यांची कंपनी अरिस्टा नेटवर्क आहे. त्याच वेळी रेणू मुंजाल सातव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण मालमत्ता ८,६९० कोटी रुपये आहे, त्यांची कंपनी हीरो फिनकॉर्प आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे