पंजाब, १२ एप्रिल २०२३ : पंजाबमधील भटिंडा येथील लष्कराच्या परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. भटिंडा मिलिटरी स्टेशन परिसरात आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ही गोळीबारची घटना घडली. घटनेत ४ जणांचा मृत्यू झाले आहे. दरम्यान मिलिटरी कॅन्टोन्मेंट परिसर सील करण्यात आला आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.
भटिंडा मिलिटरी स्टेशनवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तोफखाना युनिटचे चार लष्करी जवान शहीद झाले आहेत. इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना दुखापत किंव्हा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. हा परिसर सील करणे सुरू असून, या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी पंजाब पोलिसांसह संयुक्त तपासयंत्रणेकडून समन्वय साधला जात आहे. या घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आल्याचे भारतीय लष्करांने स्पष्ट केले आहे.
पंजाब पोलीस आणि गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोळीबारची घटना स्टेशनच्या आटिंलरी युनिटमध्ये घडली आहे. या परिसरात काही कुटुंबेही राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास पंजाब पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर