मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिली ठिणगी..!

मुंबई, १४ मे २०२१: आघाडी सरकार सत्तेत येऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये थोडाफार मतभेद होताना दिसला. विरोधी पक्षाने देखील आघाडी सरकार पडणार असे अनेक दावे केले. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षामध्ये प्रथमच ठिणगी उडाल्याचं सांगितलं जात आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाला असल्याचं सांगितलं जात आहे. विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका, असं मत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पदावरुन हटवून, त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमकणू करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचं बोललं जातंय. फडणवीस सरकारच्या आधी आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरुन सरकारला पायउतार होण्याची वेळ आली होती. त्यामुळे माझ्या (उद्धव ठाकरे) सरकारच्या काळात किंवा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असा कुठलाही डाग लागू नये, याची खबरदारी मुख्यमंत्री घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांची ही अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली गेलीय.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरुन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करु पाहत असल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रवादीची ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचवली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

जयंत पाटील काय म्हणाले?

मंत्रिमंडळाची चर्चा बाहेर सांगू नये अशी प्रथा आहे. मी याबाबत काही भाष्य करणार नाही. मला जे काही बोलायचं आहे ते आवश्यकता असेल तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. कामकाज करत असताना नाराजी धरायची नसते. त्या त्या वेळी तो तो विषय असतो. त्यामुळे कामाबाबत नाराजीची गरज नाही, असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा