कोरोनाविरुद्ध लढाईसाठी या उद्योजकाकडून पाच लाख रुपयांची मदत  

बारामती, दि. ८ ऑगस्ट २०२०: कोरोनाविरुध्द सर्वच पातळ्यांवर लढाई सुरु असताना अनेक लोक तन- मन -धनाने आपले सहकार्य करीत आहेत. बारामती शहरात देखील अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. माळेगाव येथील उद्योजक रवींद्र काळे यांनी आपले योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रवींद्र काळे यांनी वैयक्तिकरीत्या पाच लाख रुपयांचा धनादेश आज उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार, रक्कम बारामतीच्या कोविड केअर निधीमध्ये जमा केली जाणार असुन याचा वापर कोरोना विरोधात लढण्यासाठी केला जाणार आहे. बारामतीतही गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अशा स्थितीत कोरोनाविरुध्दचा लढा देण्यासाठी रवींद्र काळे यांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो या हेतूने पाच लाख रुपये देऊ केले आहेत.

कोरोनासाठी जी साधनसामग्री आवश्यक असेल त्यासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे दादासाहेब कांबळे यांनी सांगितले. रविंद्र काळे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांसाठी सक्रीय योगदान दिले आहे. बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी त्यांनी किटचे वाटप केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार व उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी त्यांच्या या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा